
परभणी, 03 जून (हिं.स.)। स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2026’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर परभणी महानगरपालिकेतर्फे प्रभाग क्रमांक 4 मधील कल्याण नगर येथे निर्माण झालेली मोठी कचराकुंडी हटवून त्या ठिकाणी वृक्षारोपण व सुशोभीकरण करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसराला स्वच्छ, हिरवेगार आणि आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे.
महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख आणि आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. नगरसेविका तथा माजी महापौर मीनाताई वरपूडकर, नगरसेवक रितेश जैन, नगरसेविका गिरीजा आजेगांवकर, गणेश उर्फ बबलू टाक, उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे आणि विभाग प्रमुख मिर्झा तन्वीर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने व सफाई कर्मचाऱ्यांच्या विशेष प्रयत्नांतून सदर कचराकुंडी हटविण्यात आली. त्यानंतर त्या जागेवर विविध वृक्षांची लागवड करून परिसराच्या सुशोभीकरणाचे काम करण्यात आले. या उपक्रमामुळे स्वच्छतेसोबतच पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे. यावेळी महापौर सय्यद इकबाल आणि उपमहापौर गणेश देशमुख यांनी नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. शहर, वॉर्ड आणि परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी असल्याचे सांगत घरातील कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीतच द्यावा, असे त्यांनी नमूद केले. नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच परभणी शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आदर्श शहर म्हणून विकसित होऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी शहर समन्वयक तुराब खान, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुर्हा, स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने, मुकादम जय मकरंद, उबाळे, तात्या, सोनू जोगदंड, रवी उबाळे, मिलिंद उबाळे, रेखा भराडे, सरूबाई दुधाते तसेच प्रभागातील सफाई कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis