
अमरावती, 03 जून (हिं.स.) : अमरावती विधान परिषद निवडणुकीत अपक्ष तथा बंडखोर उमेदवार विप्लव बाजोरिया यांच्या नामांकन अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षऱ्या करणारे नगरसेवक नेमके कोण, याबाबतची उत्सुकता अखेर संपुष्टात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाजोरिया यांचा नामांकन अर्ज रद्द केल्यानंतर छाननीत सूचक आणि अनुमोदक म्हणून शिवसेना (शिंदे), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि समाजवादी पक्षाशी संबंधित नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
0
महायुतीचा अधिकृत उमेदवार मैदानात असतानाही शिवसेना (शिंदे) समर्थक म्हणून ओळख असलेल्या विप्लव बाजोरिया यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीच्या अवघ्या अर्धा तास आधी त्यांनी अर्ज सादर केला होता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमागे कोणाचा पाठिंबा आहे, याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
अंजनगाव सुर्जीतील नगरसेवकांचा पाठिंबा
बाजोरिया यांच्या अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षऱ्या करणारे सर्व १० नगरसेवक अंजनगाव सुर्जी नगरपालिकेतील असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये शिवसेना (शिंदे), शिवसेना (उबाठा) आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांचा समावेश आहे.
शिवसेना (शिंदे) गटाचे नगरसेवक :-
पुनम येऊत
प्रियांका अंबडकर
रामण्य आंबेडकर
शिवसेना (उबाठा) गटाचे नगरसेवक :-
रूपाली देवगिरे
सीमा विजयकर
मो. रेहान अब्दुल उमुनाफ
श्रीकांत जुनघरे
सुनीता काळे
समाजवादी पक्षाचे नगरसेवक :-
अबिदाबी मो. आरीफ
इब्राहिम बेग हसन बेग
कारवाईची शक्यता; लवटे यांच्या भूमिकेकडे लक्ष
अंजनगाव सुर्जी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार गजानन लवटे करतात. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत (हर्षल) देशमुख यांना पाठिंबा देणे अपेक्षित असताना, काही नगरसेवकांनी बंडखोर उमेदवाराच्या अर्जावर सूचक म्हणून स्वाक्षऱ्या केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या नगरसेवकांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात जाऊन काम केले का आणि त्यांच्यावर पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या प्रकरणावर आमदार गजानन लवटे आणि संबंधित पक्ष नेतृत्वाची भूमिका काय असेल, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी