
सोलापूर, 03 जून (हिं.स.)। पुणे येथे मिथेनॉलमिश्रित विषारी मद्य प्राशनामुळे घडलेल्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, गावठी दारू विक्री आणि मिथेनॉलच्या गैरवापराविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समन्वयाने विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्यात येत आहे. या संदर्भात पोलीस विभागासह सर्व संबंधित यंत्रणांनी संयुक्त व प्राधान्याने कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिले आहेत.
पुणे येथील घटनेत मिथेनॉल या विषारी रसायनाचा वापर झाल्याचे निदर्शनास आले आहे. मिथेनॉल हे अत्यंत धोकादायक असून त्याच्या सेवनामुळे कायमस्वरूपी अंधत्व, कोमात जाणे, मूत्रपिंड निकामी होणे तसेच मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे नागरिकांनी अवैध मद्य, रसायन मिसळलेली दारू किंवा ढाबे/टपऱ्यांवर विनापरवाना विकल्या जाणाऱ्या मद्याचे सेवन टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून करण्यात आले आहे.
मिथेनॉलयुक्त विषारी मद्याचे दुष्परिणाम आणि अवैध मद्यनिर्मितीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जाणार आहे. महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत यांना घंटागाड्यांद्वारे ध्वनीफीत प्रसारित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विस्तृत प्रचार मोहीम राबवून अवैध मद्याचे धोके आणि कायदेशीर कारवाईबाबत माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.
अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्रांवर होणाऱ्या उत्पादनाला आळा घालण्यासाठी अधिकृत किंवा अनधिकृत वीजजोडण्या तात्काळ खंडित करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी महावितरण विभागाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समन्वयाने संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड