
सोलापूर, 03 जून, (हिं.स.)। सोलापूरकरांची जीवनवाहिनी असलेल्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये एक महत्त्वाची राजकीय भेट पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा सोलापूरचे माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांची रेल्वे प्रवासादरम्यान अनपेक्षित भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये व्हीआयपी कोचमध्ये महाराष्ट्रातील सद्य राजकीय घडामोडींवर आणि सोलापूरच्या आंबेडकरी चळवळीवर प्रदीर्घ चर्चा झाली.
मंत्री रामदास आठवले आणि माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे हे दोन्ही नेते सिद्धेश्वर एक्सप्रेसने सोलापूरहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान व्हीआयपी कोचमध्ये दोघांची भेट झाली.
या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील सद्य राजकीय पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा तर झालीच, पण त्याचसोबत मंत्री रामदास आठवले यांनी सोलापूर शहरात आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या अनेक जुन्या आणि ज्येष्ठ नेत्यांचा आवर्जून उल्लेख केला. सोलापूरमधील चळवळीचे योगदान आणि जुन्या सहकाऱ्यांच्या आठवणींना आठवले यांनी यावेळी उजाळा दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड