लातूर - ’पोलीस शेतकऱ्याच्या बांधावर’ उपक्रमातून ६६३ शेतीविषयक प्रकरणांचे निवारण
लातूर, 03 जून, (हिं.स.)। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या बांधावर जाऊन समजून घेणे, शेतीविषयक तक्रारी व वादांचे तातडीने निवारण करणे तसेच पोलीस आणि शेतकरी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलामार्फ
पोलीस कारवाई


लातूर, 03 जून, (हिं.स.)। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या बांधावर जाऊन समजून घेणे, शेतीविषयक तक्रारी व वादांचे तातडीने निवारण करणे तसेच पोलीस आणि शेतकरी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात आलेला ‘पोलीस शेतकऱ्याच्या बांधावर’ हा अभिनव उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील तब्बल ६६३ शेती व जमीनविषयक प्रकरणांचे निवारण करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून १६ मार्च २०२६ ते ३० मे २०२६ या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात आला अशी माहिती आज देण्यात आली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती रस्ते, बांधावरील वाद, पाणी वाटप, अतिक्रमण, मालकी हक्क, वहिवाट, पीक काढणी, जमिनीचे वाटप तसेच कौटुंबिक व सामाजिक वादांसंदर्भात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना पोलीस ठाणे व विविध कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. ही गैरसोय दूर करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या ऐकल्या आणि त्यांचे निवारण केले.

या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील १,००२ गावांना ग्रामभेटी देण्यात आल्या. ग्रामभेटीदरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारी, अर्ज व वादांवर तातडीने कार्यवाही करण्यात आली. अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचे समुपदेशन करून सामोपचाराने तोडगा काढण्यात आला.

निवारण करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये मालकी हक्क व वहिवाट संदर्भातील ११९, बांधावरील भांडण व वादांची १३६, पाणी हक्क व पाणी वाटपाची ४९, मोजणीसंदर्भातील ५०, जमिनीच्या वाटपाची ५७, पीक काढणीची १० तसेच इतर स्वरूपाची ३३ प्रकरणे समाविष्ट आहेत.

या उपक्रमाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे शेतीसंदर्भातील अनेक तंटे न्यायालयीन वादात किंवा गंभीर गुन्ह्यांमध्ये रूपांतरित होण्यापूर्वीच सामोपचाराने मिटविण्यात यश आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात वाचला असून ग्रामीण भागातील सामाजिक सलोखा टिकविण्यास मदत झाली आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले, “शेतकरी हा आपल्या समाजाचा आणि अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या समस्या वेळेत सोडविणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ‘पोलीस शेतकऱ्याच्या बांधावर’ या उपक्रमातून आम्ही केवळ तक्रारींचे निवारण केले नाही, तर पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे बंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातही हा उपक्रम अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येईल.”

‘पोलीस शेतकऱ्याच्या बांधावर’ हा उपक्रम लातूर जिल्हा पोलीस दलाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे उत्तम उदाहरण ठरत असून ग्रामीण भागातील तंटामुक्ती, संवाद आणि विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande