
कोल्हापूर, 03 जून (हिं.स.)। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकाचा कार्यकाल ६ एप्रिल २०२६ रोजी संपुष्टात आल्याने समितीच्या कामकाजात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. समितीमार्फत व्यवस्थापित विविध न्यासांचे दैनंदिन प्रशासकीय, आर्थिक तसेच न्यायप्रविष्ट कामकाज अखंडितपणे सुरू राहणे आवश्यक असल्याने आणि प्रशासक पद रिक्त राहिल्यास कामकाजावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी नियुक्ती केली आहे.
तसेच समितीची पुनर्रचना होईपर्यंत संबंधित न्यासांच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापन अबाधित राहावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांची ही नियुक्ती समितीची पुनर्रचना होईपर्यंत अथवा शासनाच्या पुढील आदेशापर्यंत कायम राहणार असून सदर आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे.
हा आदेश राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने उप विधि सल्लागार तथा उप सचिव सागर ज. बोंद्रे यांनी निर्गमित केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar