
सुधारणा न झाल्यास 8 जूनला आत्मदहन आंदोलनाचा इशारा
परभणी, 3 जून (हिं.स.) : जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार येथील 33 केव्ही उपकेंद्रावरून सुरू असलेल्या अवेळी भारनियमनामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने भारनियमनाच्या वेळापत्रकात तातडीने बदल करावा, अन्यथा 8 जून रोजी आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रल्हाद दाभाडे यांनी महावितरण प्रशासनाला दिला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या परभणी येथील अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात आडगाव बाजार येथील 33 केव्ही उपकेंद्रांतर्गत सुरू असलेल्या भारनियमनाच्या वेळांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, सध्याच्या भारनियमनामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत असून विशेषतः ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण
अवेळी व अनियमित वीजपुरवठ्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, भारनियमनाच्या वेळापत्रकात तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या सोयीचा विचार करून नियोजनबद्ध आणि पूर्वसूचना देऊन भारनियमन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
6 जूनपर्यंत मुदत; अन्यथा आंदोलन
महावितरण प्रशासनाने 6 जून 2026 पर्यंत प्रभावी उपाययोजना न केल्यास 8 जून रोजी आडगाव येथील 33 केव्ही उपकेंद्र कार्यालयासमोर परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास संबंधित विभाग जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
हे निवेदन प्रल्हाद रामकिसनराव दाभाडे, माजी चेअरमन, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था तसेच प्रल्हाद दाभाडे मित्र मंडळ यांच्या वतीने सादर करण्यात आले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis