
पुणे, 03 जून (हिं.स.) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एम्प्रेस गार्डन मित्र परिवाराच्या वतीने लहान मुलांसाठी ‘निसर्ग परिचय व पर्यावरण संरक्षण’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. 5 जून 2026 रोजी सकाळी 8.30 ते 10 या वेळेत एम्प्रेस गार्डन, पुणे येथे होणार आहे.
या उपक्रमात मुलांना निसर्ग, झाडे, पक्षी आणि पर्यावरण यांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात येणार आहे. तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सोप्या व मनोरंजक पद्धतीने समजावून सांगितले जाणार आहे. निसर्ग निरीक्षण, पक्षी ओळख, विविध वनस्पतींची माहिती आणि पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने कोणती जबाबदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले जाईल.
या कार्यक्रमात प्रा. रामचंद्र पवार मार्गदर्शन करणार असून, मुलांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
एम्प्रेस गार्डन मित्र परिवाराने पालकांना आवाहन केले आहे की, अधिकाधिक मुलांनी या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण संरक्षणाचा संदेश आत्मसात करावा. लहान वयातच पर्यावरणपूरक जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वासही आयोजकांनी व्यक्त केला आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु