
सोलापूर, 03 जून (हिं.स.)। अन्न व औषध प्रशासनाने शहरातील गुटखा, मावा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रेत्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली असून, 1 एप्रिलपासून आतापर्यंत 26 कारवाया करून 32 लाख 37 हजार 424 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अनेक पानटपऱ्यांना कुलूप लागल्याचे चित्र दिसत आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या तीन विशेष पथकांकडून शहरातील विविध भागांमध्ये तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. कारवाईच्या भीतीने काही पानटपरी चालकांनी दुकाने बंद ठेवली असून, काही विक्रेते आडोशाला थांबून मावा विक्री करत असल्याचेही निदर्शनास येत आहे. आसरा चौक, बेगम पेठ पोलिस चौकी परिसर, सात रस्ता ते रेल्वे स्टेशन मार्ग, मौलाली चौक, नवी पेठ यांसारख्या भागांमध्ये प्रतिबंधित पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अनेक विक्रेते तुकडा सुपारीचा साठा करून मावा तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी माव्यात अमली पदार्थ मिसळले जात असल्याची चर्चाही सुरू आहे.
शहरातील मावा विक्रीची उलाढाल दरमहा सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचे बोलले जात असताना प्रशासनाने या अवैध व्यवसायाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. प्रतिबंधित पदार्थांचा साठा व विक्री करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 123 अंतर्गत लोकांच्या आरोग्याशी खेळ केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले जात आहेत.
याबाबत माहिती देताना सहायक आयुक्त सुनील जिंतूरकर यांनी सांगितले की, शासनाने बंदी घातलेल्या गुटखा, मावा व सुगंधित तंबाखूच्या साठा आणि विक्रीविरोधात सोलापूर शहर व जिल्ह्यात सातत्याने कारवाई सुरू आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 123 अंतर्गत संबंधितांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
प्रशासनाच्या या मोहिमेमुळे शहरातील प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड