
सोलापूर, 03 जून (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील हातभट्टी दारू निर्मितीविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या असून, आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने गूळ व्यापारी, मिथेनॉल उत्पादक कंपन्या, त्यांचे पुरवठादार आणि ग्राहकांची सविस्तर माहिती मागविली आहे. या माध्यमातून गूळ व मिथेनॉलचा वापर नेमका कोणत्या उद्देशासाठी केला जातो, याचा मागोवा घेतला जाणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर कारवाईदरम्यान वारंवार खराब दर्जाचा अथवा खाद्यगूळ आढळून आला आहे. त्यामुळे गूळ उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी आपला माल केवळ अधिकृत खरेदीदारांनाच विकावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात गूळ किंवा मिथेनॉल खरेदी करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांकडून त्याचा वापर बेकायदा दारू निर्मितीसाठी होत नसल्याची खात्री करणे आवश्यक असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
तपासादरम्यान गावठी दारू तयार करण्याच्या ठिकाणी आढळलेला गूळ अथवा कच्चा माल जाणीवपूर्वक पुरविण्यात आल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय, गावागावांतील सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील आणि तलाठी यांनी त्यांच्या हद्दीतील हातभट्ट्या, कच्चा माल पुरवठादार, गूळ व्यापारी, खांडसरी मळी तसेच अवैध मद्यार्क निर्मितीबाबतची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.
विषारी दारूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिका व नगरपालिकांच्या घंटागाड्यांद्वारे ध्वनीफिती प्रसारित केल्या जाणार आहेत. तसेच हातभट्ट्यांना पुरविला जाणारा अवैध वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यासाठी महावितरणकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 नुसार परवानगीशिवाय दारू निर्मिती, साठवणूक, विक्री किंवा वाहतूक करणे हा गुन्हा असून, दोषी आढळल्यास 5 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड आणि तीन महिने ते तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. दरम्यान, जिल्हा हातभट्टीमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी प्रशासनाला मोठे सहकार्य केल्याबद्दल भाग्यश्री जाधव यांनी विशेष उल्लेख केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड