
कोल्हापूर, 03 जून (हिं.स.)। किरकोळ कारणातील वादातून शिरोलीतील गुंडाच्या टोळक्याने
पेठवडगाव ता हातकणंगले येथील बालाजी पार्क परिसरातून एका तरुणाचे जबरदस्तीने अपहरण करुन त्याला शिरोली तसेच सादळे-मादळे घाटात नेऊन जिवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली. ऋत्विक रामचंद्र जाधव असे यातील गंभीर जखमी तरुणाचे नाव असून त्याला मारहाण करणारी टोळी शिरोली माळवाडी येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगार रोहित सातपुते याची आहे. या प्रकरणी रोहित सातपुतेसह 8 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील अटक केलेल्याना पोलीस कोठडी मिळाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी आदीनाथ नसरिंगे आणि ऋत्विक जाधव याचा वाद झाला. आदिनाथ याने रोहित सातपुतेला बोलवतो अशी धमकी दिली. ऋत्विकने त्याला जुमानले नाही म्हणून रोहित याने इतर साथीदारांना बरोबर घेऊन ऋत्विकच्या पेठ वडगाव बालाजी पार्क येथील घरात घुसले. तेथे ऋत्विक मिळून आला नाही म्हणून त्याच्या वडिलांना मारहाण केली. त्यांच्या मोबाईल फोनवरून ऋत्विक कोठे आहे याची माहिती घेतली. तो शिरोलीत असल्याचे समजताच ही टोळी शिरोलीत आली. तेथील सावंत कॉलनी परिसरात पकडून मारहाण केली. आणि एका गाडीत घालून सादळे-मादळेच्या डोंगरावरील जंगलात नेले. तेथे ऋत्विकला ठार मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेला
ऋत्विक बेशुद्ध झाला. त्याला तेथेच सोडून ही टोळी निघून गेली. त्याच्या घरच्यानी त्याला उचलून आणले. पण या टोळीने त्याला शिरोली, कोल्हापूर परिसरात उपचारासाठी नेऊ नये म्हणून धमकी दिली. त्यामुळे त्याला मिरजमध्ये नेले.
कोमात असलेल्या ऋत्विक वर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात 7 जणांसह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध पेठवडगाव व शिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामचंद्र शंकर जाधव (वय 57, व्यवसाय-व्यापार, रा. बालाजी पार्क, पेठवडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन प्रशांत उबाळे, आदीनाथ नसरिंगे, रोहीत शहाजी सातपुते, प्रताप शिवाजी भोरे, अली तानेखान, विशाल कांबळे, आणि अनिकेत कांबळे (सर्व रा.शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) व एका अनोळखी तरुण यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपींनी फिर्यादीची पत्नी व मुलगी यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच काही लोकांच्या मध्यस्थीने उपचाराचा खर्च देण्याची तयारी दाखवून तक्रार देण्यापासून परावृत करण्याचा प्रयत्न केल्याचेही समजते. आरोपींच्या या दहशतीमुळे भीतीपोटी तक्रार देण्यास विलंब झाला. फिर्यादींनी याबाबत पोलिसांनाही सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास पेठवडगाव व शिरोली पोलिस करीत आहेत यातील आदिनाथ नरसिंगे अटक केली आहे त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar