अभाविपच्या पुढाकारातून विद्यार्थी अनुपस्थिती सर्वेक्षणावर गोलमेज परिषद; मान्यवरांचे मंथन
मुंबई, 03 जून, (हिं.स.)। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), मुंबई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली विद्यार्थी अनुपस्थिती सर्वेक्षण : गोलमेज परिषद आज डॉ. होमी भाभा स्टेट यु
मुंबई


मुंबई, 03 जून, (हिं.स.)। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), मुंबई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली विद्यार्थी अनुपस्थिती सर्वेक्षण : गोलमेज परिषद आज डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, चर्चगेट येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांना एकत्र आणून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीशी संबंधित आव्हाने, कारणे आणि उपाययोजना यांवर सखोल चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

परिषदेस महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्या डॉ.मनीषा कायंदे, अभाविपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. मंदार भानुशे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अमित शेष तसेच डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास पाध्ये यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय मुंबईतील विविध विद्यापीठांचे आणि महाविद्यालयांचे प्राध्यापक, सिनेट सदस्य आणि विद्यार्थी प्रतिनिधी, प्रचार्य व संस्थाचालक सहभागी झाले होते.

अभाविपने राबविलेल्या विद्यार्थी अनुपस्थिती सर्वेक्षणातील निष्कर्षांचे सादरीकरण डॉ. हंसराज जोशी यांनी यावेळी केले.विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये घट होण्यामागील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, मानसिक तसेच तांत्रिक घटकांचा अभ्यासपूर्ण आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या बदलत्या अपेक्षा, अध्यापनातील नवोन्मेषाची गरज, कौशल्याधारित शिक्षण, उद्योग-जगताशी संलग्नता आणि शैक्षणिक वातावरण अधिक विद्यार्थी-केंद्रित करण्याच्या आवश्यकतेवर मान्यवरांनी विचार मांडले.

डॉ.मनीषा कायंदे यांनी अभाविपच्या या उपक्रमाचे कौतुक करताना, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण सर्वेक्षण करून त्यावर धोरणात्मक चर्चा घडवून आणणे ही स्वागतार्ह बाब असल्याचे नमूद केले. विद्यार्थी उपस्थितीचा विषय हा केवळ प्रशासनिक विषय नसून शिक्षणाच्या गुणवत्तेशी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यातील विकासाशी निगडित असल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चेतून पुढे येणाऱ्या सूचना राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्थेसाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रा. मंदार भानुशे यांनी विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया असल्याचे सांगत, शिक्षण व्यवस्थेतील सर्व घटकांनी विद्यार्थ्यांमध्ये वर्गकेंद्री शिक्षणाविषयी सकारात्मकता निर्माण करण्यासाठी संयुक्तपणे कार्य करण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि शिक्षण संस्थांच्या कार्यपद्धती यामध्ये सुसंवाद निर्माण करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. रजनीश कामत यांनी विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी अध्यापन पद्धती अधिक परिणामकारक, संवादात्मक आणि तंत्रज्ञानस्नेही करण्यावर भर दिला. शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना केवळ उपस्थितीपुरते मर्यादित न ठेवता ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

परिषदेत विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यासाठी खालील मुद्द्यांवर विशेष भर दिला:

* अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.

* विद्यार्थी-केंद्रित आणि अनुभवाधारित शिक्षण पद्धतींचा अवलंब.

* विद्यार्थी-शिक्षक संवाद अधिक सुदृढ करणे.

* कौशल्यविकास आणि रोजगाराभिमुख उपक्रमांना चालना.

* मानसिक आरोग्य, समुपदेशन आणि विद्यार्थी सहाय्य यंत्रणा बळकट करणे.

* पालक, संस्था आणि विद्यार्थी यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करणे.

* शैक्षणिक परिसर अधिक प्रेरणादायी आणि सहभागी स्वरूपाचा बनविणे.

परिषदेतून प्राप्त झालेल्या सूचना आणि शिफारसींचे संकलन करून संबंधित विद्यापीठे, महाविद्यालये आणि धोरणनिर्मात्यांकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. विद्यार्थी उपस्थिती वाढविणे, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करणे आणि उच्च शिक्षण व्यवस्थेला अधिक परिणामकारक बनविणे या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरल्याचे सर्व उपस्थितांनी नमूद केले.

विद्यार्थी हित, शैक्षणिक गुणवत्ता आणि भविष्याभिमुख शिक्षण व्यवस्थेच्या निर्मितीसाठी अभाविपने घेतलेला हा पुढाकार शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

परिषदेस अभाविप कोकण प्रदेश अध्यक्ष वैद्य.कैलास सोनमनकर, प्रदेश मंत्री राहुल रजोरिया, मुंबई महानगर मंत्री प्रशांत माळी तसेच सह-मंत्री अभिषेक पवार यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande