
सोलापूर, 03 जून (हिं.स.)। उजनी कालव्यातील पाणी माण नदीपात्रात सोडण्यास प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत माण नदीकाठच्या 16 गावांतील शेतकऱ्यांनी मल्लेवाडी परिसरात पंढरपूर-विजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली असून, प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गतवर्षी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असतानाही शेती पिकांसाठी योग्य नियोजन करण्यात आले नाही. कधी नदीपात्रात पाणी सोडण्यास विलंब होतो, तर कधी कालव्यातून पाणीपुरवठा वेळेवर होत नाही. यंदाही माण नदीपात्रात पाणी सोडण्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाढत्या तापमानात पिके जळू लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
पिके वाचविण्यासाठी उजनी कालवा क्रमांक 52 मधून माण नदीपात्रात तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी माण संघर्ष समिती यांच्या वतीने मे महिन्यात निवेदनाद्वारे करण्यात आली होती. तसेच, मागणी मान्य न झाल्यास 2 जून रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी मागणीची दखल घेतली नाही, असा आरोप करत शेतकऱ्यांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. सकाळी साडेनऊच्या सुमारास शेतकरी महामार्गावर उतरल्याने पंढरपूर-विजापूर मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली.
आंदोलनकर्त्यांनी पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल केल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून माण नदीपात्रात पाणी सोडावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकरी प्रतिनिधींनी दिला. दरम्यान, या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील चर्चेनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड