खत वितरणाच्या पथदर्शी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी : कोल्हापूर जिल्हाधिकारी
कोल्हापूर, 03 जून (हिं.स.)। केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित खत वितरणासाठी ''फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल'' (FFFS) हा नाविन्यपूर्ण पथदर्शी प्रकल्प येत्या शुक्रवार, दिनांक 5 जून रोजी सुरू होत आहे. या विशेष प्रणालीच्या अंम
अनुदानित खत वितरणासाठी आढावा


कोल्हापूर, 03 जून (हिं.स.)। केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित खत वितरणासाठी 'फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल' (FFFS) हा नाविन्यपूर्ण पथदर्शी प्रकल्प येत्या शुक्रवार, दिनांक 5 जून रोजी सुरू होत आहे. या विशेष प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या पथदर्शी प्रकल्पाची जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत संपूर्ण माहिती पोहोचवून प्रभावी अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत दिले आहेत.

या तालुकास्तरीय आढावा बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. या संपूर्ण प्रकल्पाचे गावपातळीवर योग्य नियोजन करण्यासाठी आणि व्यापक जनजागृती करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तालुका पातळीवरील कृषी मित्र, कृषी सखी, ग्राम महसूल व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक गावासाठी एक स्वतंत्र अधिकारी किंवा कर्मचारी नियुक्त केला जाणार असून, हे नियुक्त कर्मचारी 5 ते 7 जून दरम्यान गावपातळीवर शेतकरी, सरपंच आणि लोकप्रतिनिधींना या नवीन प्रणालीची सविस्तर माहिती देतील.

या प्रकल्पामध्ये ॲग्री स्टॅक (Farmer ID) आणि खत वितरणाच्या आय.एफ.एम.एस. प्रणालीचे एकत्रिकरण करण्यात आले असून यामुळे खतांच्या गैरवापराला आळा बसेल आणि अनुदानित खतांचे समन्यायी वाटप करणे शक्य होईल. शेतकऱ्यांना खत खरेदी सुलभ व्हावी यासाठी प्ले स्टोअरवर 'Framework For Fertilizer Sale' हे विशेष मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपच्या वापरामुळे शेतकऱ्यांना आता दुकानांमध्ये खतांसाठी ताटकळत रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही, तसेच दुकानात खतांचा साठा उपलब्ध आहे की नाही याचीही अचूक माहिती आधीच मिळणार आहे.

ॲपमध्ये नोंदणी करताना शेतकऱ्यांनी आपले राज्य निवडून, आधार क्रमांक व ओटीपीद्वारे पडताळणी करायची आहे. त्यानंतर स्वतःच्या किंवा संयुक्त मालकीच्या जमिनीची माहिती, पिकाचा हंगाम आणि शासनाच्या शिफारसीनुसार आवश्यक असणारे खत व गोण्यांची संख्या निश्चित करून जवळील नोंदणीकृत खत विक्रेता निवडायचा आहे. खत स्वतः घ्यायचे असल्यास स्वतःचा पर्याय किंवा प्रतिनिधी पाठवायचा असल्यास त्याची माहिती भरून आधार व मोबाईल क्रमांक पडताळणी पूर्ण करावी लागेल.

ॲपवर खताची मागणी यशस्वीरीत्या नोंदवल्यानंतर एक 'क्यू आर कोड' आणि टोकन नंबर तयार होईल, जो शेतकऱ्यांनी सुरक्षित जतन करून ठेवणे आवश्यक आहे. हा बुक केलेला खताचा साठा संबंधित कृषी सेवा केंद्रावर पुढील तीन दिवसांसाठी त्या शेतकऱ्याच्या नावे राखीव राहील. या तीन दिवसांच्या कालावधीत शेतकऱ्याने आपल्या सवडीनुसार दुकानात जाऊन तो क्यू आर कोड स्कॅन करून घ्यायचा आहे आणि विक्रेत्याकडून खत प्राप्त करून त्याची पावती घ्यायची आहे. या सुलभ डिजिटल पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून, खत वितरणात पारदर्शकता येणार आहे. खत खरेदी किंवा ॲप हाताळणीत काही अडचण अथवा तक्रार आल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande