पुणे महापालिकेचा कडक बडगा; जनगणना कामातील हलगर्जीपणावर कारवाई
पुणे, 03 जून (हिं.स.)।जनगणनेच्या कामात निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केल्याप्रकरणी महापालिकेच्या येरवडा-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित न
pmc


पुणे, 03 जून (हिं.स.)।जनगणनेच्या कामात निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केल्याप्रकरणी महापालिकेच्या येरवडा-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी हा आदेश जारी केला असून, प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करण्याचे निर्देशही दिले आहेत.

येरवडा-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील जनगणना कामकाजासाठी राजेश गुर्रम यांची ‘जनगणना अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई येथील जनगणना संचालनालयाने दिलेल्या निर्देशांनुसार हे काम निर्धारित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक होते. त्यामध्ये सीएमएमएस पोर्टलवर प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नोंदणी, नियुक्तीपत्रांचे वितरण, घरयादी गटांची निर्मिती, प्रशिक्षण तसेच दैनंदिन कामकाजाचा आढावा घेणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपविण्यात आल्या होत्या.

मात्र, उपलब्ध मनुष्यबळाचे योग्य नियोजन करण्यात अपयश आल्याने या क्षेत्रातील जनगणना प्रक्रिया रखडल्याचे निदर्शनास आले. महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी वेळोवेळी घेतलेल्या आढावा बैठकीत कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना दिल्यानंतरही अपेक्षित प्रगती झाली नाही.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून कामात टाळाटाळ केल्याचा तसेच प्रत्यक्ष स्थितीबाबत दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी गुर्रम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. यापुढे जनगणना कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande