
पुणे, 03 जून (हिं.स.)।शहर पोलीस दलातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार शहरातील १८ पोलीस ठाणे आणि विविध शाखांमधील निरीक्षकांच्या नियुक्त्या व बदल्या करण्यात आल्या आहेत.
या फेरबदलात कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांची फरासखाना पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून, फरासखाना येथील गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके यांची कोथरूड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांची काळेपडळ पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली असून, वाहतूक शाखेतील निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्याकडे डेक्कन पोलीस ठाण्याची धुरा सोपविण्यात आली आहे. काळेपडळचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांची भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात, तर विश्रांतवाडीचे वरिष्ठ निरीक्षक संतोष खेतमाळस यांची लष्कर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. खडक पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय करनूर यांची नऱ्हे पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली असून, लष्कर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेतील निरीक्षक प्रदीप पवार यांची लोणी काळभोर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, राहुलकुमार खिलारे, भाऊसाहेब पाटील आणि आसाराम शेटे यांची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील निरीक्षक पंडित रेजितवाड यांची वानवडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
तसेच निरीक्षक उत्तम नामवाडे यांची विशेष शाखेत, नवनाथ जगताप यांची विश्रामबाग पोलीस ठाण्यात आणि वाहतूक शाखेतील निरीक्षक संगीता जाधव यांची वानवडी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. अलीकडेच पुणे पोलीस दलात रुजू झालेले निरीक्षक संतोष कोळी यांचीही गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु