
पुणे, 03 जून (हिं.स.) युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढलेले पेट्रोल-डिझेलचे दर आणि राज्यभरातील तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळा उशिरा सुरू होणार किंवा ऑनलाइन पद्धतीने वर्ग भरविण्यात येणार असल्याच्या चर्चांना शिक्षण विभागाने पूर्णविराम दिला आहे. राज्यातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासूनच नियोजित वेळेनुसार सुरू होणार असून, वर्ग पारंपरिक ऑफलाइन पद्धतीनेच भरविले जाणार आहेत.
शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुटी देण्यात आली आहे. राज्यभरातील शाळांच्या सुटीच्या कालावधीत एकवाक्यता आणि सुसंगती राहावी यासाठी यापूर्वीच आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ 15 जूनपासूनच होणार असून, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच, शाळा ऑनलाइन सुरू करण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील इतर शिक्षण मंडळांशी संलग्न शाळा त्यांच्या स्वतंत्र वेळापत्रकानुसार सुरू असतील किंवा त्या ठिकाणी महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात येत असतील, तर सुटीबाबतचा निर्णय संबंधित शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर झाला असून, नव्या शैक्षणिक वर्षाच्या तयारीला आता वेग येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु