
पुणे, 03 जून, (हिं.स.)। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांअंतर्गत पुणे जिल्ह्यात 2025-26 या आर्थिक वर्षात सुमारे 148 कोटी 98 लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून, 29 हजार 700 शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी ही माहिती दिली. वितरित करण्यात आलेल्या अनुदानामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजनेचा सर्वाधिक वाटा असून, या योजनेसाठी तब्बल 97 कोटी 74 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
वाढती मजूरटंचाई आणि शेतीतील कामांचा वाढता खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांचा कल यांत्रिकीकरणाकडे वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. कृषी योजनांच्या लाभासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाते. निवड झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या शेताची अथवा खरेदी केलेल्या कृषी उपकरणांची क्षेत्रीय स्तरावर मोका तपासणी केली जाते. तपासणी पूर्ण झाल्यानंतर ‘एसएनए-स्पर्श’ प्रणालीद्वारे अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
पारदर्शक आणि ऑनलाइन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना योजनांचा लाभ अधिक सुलभपणे मिळत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, पुणे जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरण अभियानातील विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले असून, शेतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी शेतकरी पुढाकार घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु