
सोलापूर, 03 जून (हिं.स.) - महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या बारा गावांतील नागरिकांना मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या नगरभूमापन मोहिमेच्या कामाचा आढावा बुधवारी महापालिकेच्या कॉन्सिल हॉलमध्ये घेण्यात आला. या मोहिमेमुळे नागरिकांना ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड मिळण्याबरोबरच मालमत्तेसंबंधीचे वाद कमी होण्यास मदत होणार आहे. महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत नगरभूमापन प्रक्रियेचे सादरीकरण करण्यात आले. उपअधीक्षक सचिन पवार यांनी सर्वेक्षणाची उद्दिष्टे, नागरिकांना होणारे फायदे, आवश्यक कागदपत्रे आणि पुढील कार्यपद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली. सर्वेक्षणातून तयार होणाऱ्या डिजिटल नकाशांमुळे नागरिकांना ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार आहे. तसेच मालमत्तेची अधिकृत नोंद उपलब्ध झाल्याने मालमत्तेसंबंधीचे वाद कमी होण्यास मदत होणार आहे. प्रॉपर्टी कार्ड आणि सनद प्राप्त झाल्यानंतर बँक कर्ज, आर्थिक व्यवहार तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.
यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी नगरसेवकांनी नागरिक आणि नगरभूमापन कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधून मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच सर्वेक्षणाचे काम निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी नगरभूमापन विभागाला महापालिकेच्या नगररचना व मालमत्ता विभागामार्फत समन्वय अधिकारी उपलब्ध करून दिले जातील, असे सांगत सर्वेक्षणाचे काम प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. बैठकीत विविध नगरसेवकांनीही मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सूचना मांडल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड