
सोलापूर, 03 जून (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या प्राथमिक शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला विलंब होत असल्याने अनेक शिक्षक गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अतिरिक्त घोषित करण्यात आलेल्या शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून बंद करण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची भावना शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.
शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या सुधारित संचमान्यतेनुसार जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नियमानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे इतर शाळांमध्ये समायोजन करणे अपेक्षित असते. मात्र, ही प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने अनेक शिक्षकांना नियमित वेतनापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाच्या नियमावलीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे वेतन मूळ शाळेतून थांबविण्यात आले आहे. परंतु समायोजनाचे आदेश प्रलंबित असल्याने या शिक्षकांना नवीन नियुक्तीस्थळीही वेतन मिळत नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
वेतन बंद झाल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, गृहकर्ज व इतर कर्जांचे हप्ते तसेच दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले असल्याची व्यथा शिक्षकांनी व्यक्त केली आहे. समायोजन प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रलंबित वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी संबंधित शिक्षकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रश्नावर शिक्षण विभागाने लवकरात लवकर निर्णय घेऊन अतिरिक्त शिक्षकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड