रत्नागिरी : बेपत्ता महिलेचा मृतदेह डिंगणी खाडीपात्रात आढळला
रत्नागिरी, 30 जून (हिं.स.) । मुलाचे लग्न जुळत नसल्याच्या मानसिक तणावातून परचुरी येथून बेपत्ता झालेल्या ५४ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह डिंगणी खाडीपात्रात आढळला आहे. अंजनी अर्जुन वेद्रे (रा. परचुरी वेद्रेवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत महिलेचे नाव आहे
रत्नागिरी : बेपत्ता महिलेचा मृतदेह डिंगणी खाडीपात्रात आढळला


रत्नागिरी, 30 जून (हिं.स.) । मुलाचे लग्न जुळत नसल्याच्या मानसिक तणावातून परचुरी येथून बेपत्ता झालेल्या ५४ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह डिंगणी खाडीपात्रात आढळला आहे. अंजनी अर्जुन वेद्रे (रा. परचुरी वेद्रेवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत महिलेचे नाव आहे.

अंजनी वेद्रे यांच्या मुलाचे लग्न जुळत नसल्यामुळे त्या गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होत्या. त्यातूनच त्या गेल्या २६ जून २०२६ रोजी सकाळी घरात कोणालाही काहीही न सांगता अचानक निघून गेल्या होत्या. त्या घरी न दिसल्याने त्यांचे पती अर्जुन यशवंत वेद्रे व नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांचा पत्ता लागला नव्हता. अखेर या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची रीतसर नोंद करण्यात आली होती.

पोलीस आणि नातेवाईक त्या महिलेचा कसून शोध घेत असतानाच, डिंगणी येथील खाडीपात्रात काठालगत एक मृतदेह अडकल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली असता तो मृतदेह अंजनी वेद्रे यांचाच असल्याची खात्री पटली.

या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या डिंगणी उपक्षेत्राचे अंमलदार अरुण बी. वानरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळाचा रीतसर पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande