
नंदुरबार, 30 जून (हिं.स.) नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारी व अडचणींचे शासकीय यंत्रणेकडून न्याय व तत्परतेने निवारण व्हावे, यासाठी 6 जुलै 2026 रोजी दुपारी 01.00 वाजता जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे
आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात करण्यात आले आहे, नागरिकांना
आपल्या प्रलंबित तक्रारी व निवेदने सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.
सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी व अडचणी सोडवण्यासाठी शासन परिपत्रकान्वये तालुका, जिल्हा, विभागीय
आणि मंत्रालय स्तरावर लोकशाही दिन राबविण्याचा प्रभावी उपाय योजण्यात आला आहे. यानुसार
नंदुरबार जिल्ह्यात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय तर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या
सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो.
नागरिकांनी आपल्या शासकीय कार्यालयातील कामासंबंधीच्या वैयक्तिक तक्रारी सर्वप्रथम प्रत्येक
महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या तालुकास्तरीय लोकशाही
दिनात दाखल करणे बंधनकारक आहे. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील निर्णयावर समाधान न
झाल्यासच नागरिकांना जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आपली तक्रार किंवा निवेदन सादर करता येईल.
थेट जिल्हास्तरावर येणाऱ्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नसल्याने नागरिकांनी या रचनेची नोंद घ्यावी,
असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि गतिशीलता आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत 6
जुलै रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात संबंधित सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार
आहेत. नागरिकांनी आपल्या प्रलंबित मागण्या आणि तक्रारी विहित नमुन्यात व आवश्यक पुराव्यांसह
सादर कराव्यात, जेणेकरून त्यावर वेळेत निर्णय घेणे शक्य होईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी
कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर