
सोलापूर, 30 जून, (हिं.स.) - आषाढी शुद्ध एकादशी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल होतात. भाविकांना कमी वेळेत आणि अधिक सुलभ पद्धतीने दर्शन मिळावे, यासाठी १० जुलैपासून व्हीआयपी दर्शन बंद करण्यात येणार असून मंदिर परिसर ‘नो व्हेईकल झोन’ घोषित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
आषाढी वारीच्या अनुषंगाने केबीपी महाविद्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी विविध विभागांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. बैठकीस जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक अभिजीत औटी, पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत डगळे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे यांनी सांगितले की, आषाढी वारी सुरळीत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून काम करावे. वारकरी आणि भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी सर्व आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड