
मुंबई, 30 जून (हिं.स.)।
महाराष्ट्रात बिश्नोई गँगच्या नावावरून सुरू असलेली खंडणी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि गोळीबाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरत गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
पिंपरी-चिंचवड येथील फर्निचर व्यावसायिकाच्या दुकानावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारल्याचे सोशल मीडियावर समोर आले. या प्रकरणात व्यापाऱ्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती आणि जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. अशा प्रकारच्या घटना आता राज्यात वारंवार घडत असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सरकारला सवाल केला की, लॉरेन्स बिश्नोई गुजरातमधील तुरुंगात असताना त्याची टोळी राज्यात दहशत कशी निर्माण करत आहे? तुरुंगातून अथवा परदेशातून गुन्हेगारी कारवाया कशा नियंत्रित केल्या जात आहेत? महाराष्ट्र पोलिसांनी या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी नेमकी कोणती कारवाई केली आहे?
या प्रकरणात १२ आरोपींपैकी केवळ ४ आरोपींना अटक करण्यात आली असून ८ आरोपी अद्याप फरार आहेत. घटना मे महिन्यात घडली, मात्र सव्वा महिना उलटूनही मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. हा तपासातील अपयशाचा स्पष्ट पुरावा असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
प्रश्नोत्तर काळात वडेट्टीवार म्हणाले, सलमान खान ,काँग्रेस आमदारांना साजिद पठाण, माजी राज्यमंत्र्यांची हत्या झाली आहे, व्यापाऱ्यांवर गोळीबार अशा अनेक घटना सातत्याने घडत आहेत. तरीही बिश्नोई गँग आणि त्यांच्या नेटवर्कवर निर्णायक कारवाई होताना दिसत नाही. आरोपी परदेशात आहेत, व्हीपीएनचा वापर करतात, असे सांगून सरकार जबाबदारी झटकू शकत नाही. जनतेच्या सुरक्षेचीu जबाबदारी सरकारचीच आहे.
तसेच, शुभम लोणकर आणि बिश्नोई गँगच्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना या गँगने नवीन मोडस ऑपरेंडी अवलंबली आहे. ते धमकी देतात, भाड्याने गुंडांना घर,कार्यालय आसपास गोळीबार करून भीती पसरवण्याचे काम सुरू आहे.
पण भाड्याच्या गुंडांचा बंदोबस्त केलेला आहे. या गँग मध्ये ही फूट पडली आहे वर्चस्वाची लढाई सुरू आहे पण पोलिस त्यांचा बंदोबस्त करण्यात येत आहे असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर