
छत्रपती संभाजीनगर, 30 जून (हिं.स.) : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे यंदाही ‘चरण सेवा’ उपक्रम राबविण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाअंतर्गत जिल्हा प्रशासन, शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये, विविध आरोग्य संस्था, सेवाभावी संघटना आणि स्वयंसेवक यांच्या समन्वयातून पालखी मार्गावरील मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आरोग्य व सेवासुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार आणि आरोग्य जनजागृतीचा समावेश आहे.या उपक्रमात सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या ११ प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे. पालखी मार्गावरील सुमारे ४०० मुक्कामस्थळी चरण सेवा व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या उपक्रमासाठी १२ हजारांहून अधिक प्रशिक्षित डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक कार्यरत आहेत.वारकऱ्यांच्या पायांना होणारा ताण, सूज, वेदना, फोड आणि स्नायूंचा थकवा कमी करण्यासाठी सुमारे ३ हजार लिटर आयुर्वेदिक तेल उपलब्ध करून देण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे.८ आरोग्य रथांच्या माध्यमातून आरोग्य योजना, स्वच्छता, संसर्गजन्य आजारांपासून बचाव आणि निरोगी जीवनशैली याबाबत जनजागृती केली जाणार आहे. तसेच विविध ठिकाणी योगसत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे.गेल्या वर्षी या उपक्रमाचा सुमारे १ लाख ७५ हजार वारकऱ्यांना थेट लाभ मिळाला होता, तर १० लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत आरोग्य जनजागृतीचा संदेश पोहोचला होता.
‘भक्ती विठोबाची... सेवा आरोग्याची’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाला आधुनिक वैद्यकीय सेवेची जोड देणारा अभिनव प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुदृढ आणि सुखकर व्हावा यासाठी हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis