
छत्रपती संभाजीनगर, 30 जून (हिं.स.)। भाजपाचे नेते माजी आमदार संजय केणेकर यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शहरातील पाणीपुरवठा व जलनिस्सारण योजनेतील कथित अनियमितता, आर्थिक नुकसान आणि जुनी PMC यश इन्फोटेक यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
शहराच्या विकासाशी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या निष्काळजीपणाला अथवा भ्रष्टाचाराला थारा मिळता कामा नये. नागरिकांच्या पैशांचा योग्य वापर होणे, जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी होणे आणि दोषींवर कठोर कारवाई होणे हीच आमची भूमिका आहे. छत्रपती संभाजीनगरकरांना दर्जेदार व अखंड पाणीपुरवठा मिळावा आणि शहराच्या विकासकामांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व कायम राहावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis