
परभणी, 30 जून (हिं.स.) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार परभणी जिल्हयात आजपासून (३० जून) मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या मोहिमेंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घराघरात जाऊन मतदारांची माहिती पडताळून पाहणार आहेत. बीएलओ भेटीदरम्यान नागरिकांनी गणना अर्ज आवश्यक माहिती भरून स्वाक्षरीसह परत द्यावा व पोच घेऊन अर्जाची एक प्रत स्वतःकडे सुरक्षित ठेवावी. तरी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नतिशा माथुर यांनी केले आहे.
कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही आणि कोणताही अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही या उद्दिष्टाने ही विशेष मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार, नायब तहसिलदार सतीश रेड्डी, सहायक महसूल अधिकारी दत्ता गिणगिने आदींसह पत्रकार उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis