
रत्नागिरी, 30 जून (हिं.स.) । माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून विद्यमान केंद्रीय सहकार मंत्री अमितभाई शहा यांच्यापर्यंतच्या सर्वच सरकारांनी सहकार क्षेत्रासाठी मोठे पाठबळ दिल्यानेच महाराष्ट्रात आणि कोकणात सहकार चळवळ वृद्धिंगत झाली, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी केले.
केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापना दिवसाच्या निमित्ताने येथील मराठा भवनात आज रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकार मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख म्हणून श्री. जाधव बोलत होते.
यावेळी जिल्हा बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. गिम्हवणेकर, बँकेचे संचालक आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, बँकेचे संचालक रामभाऊ गराटे, अमजद बोरकर, आबा टिळेकर, सौ. नेहा माने, गजानन पाटील, मंदार सप्रे आदींसह अन्य संचालक उपस्थित होते.
ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले की सहकारी संस्थांनी चांगला व्यवसाय करून चांगला नफा मिळवला पाहिजे. सहकारी संस्थांची प्रगती झाली तर आसपासच्या गावांचीसुद्धा प्रगती होते. जगात जे काही बदल घडत आहेत, त्यानुसार सहकारी संस्थांनीदेखील आधुनिक बदल केले पाहिजेत. मेळाव्याला सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी