
परभणी, 30 जून (हिं.स.)। तख्त सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब गुरुद्वारा अधिनियम 1956 रद्द करून नवीन कायदा करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या प्रस्तावित निर्णयाला विरोध दर्शवत विद्यमान 1956 चा कायदा कायम ठेवावा आणि गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुका तातडीने घ्याव्यात, अशी मागणी दशमेश पिता गुरुगोबिंदसिंहजी सेवाभावी संस्था, परभणी यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी, परभणी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम 1956 रद्द करून नवीन कायदा करण्याचा निर्णय समोर आल्यानंतर नांदेड व मराठवाड्यातील शीख समाजामध्ये चिंता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. 23 जून 2026 रोजी गुरुद्वाराचे आदरणीय पंजप्यारे साहिबान यांच्या सानिध्यात शीख समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत समाजाच्या भावना लक्षात घेऊन प्रस्तावित ‘गुरुद्वारा सचखंड अधिनियम 2026’ अमान्य करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संस्थेच्या म्हणण्यानुसार, 1956 च्या कायद्याअंतर्गत गुरुद्वारा बोर्डाचा कारभार अनेक वर्षांपासून यशस्वीपणे सुरू होता. सध्याची परिस्थिती कायद्यातील त्रुटींमुळे निर्माण झालेली नसून वेळेवर निवडणुका न झाल्यामुळे निर्माण झाली आहे. शासनाने 29 जून 2022 रोजीच्या अधिसूचनेद्वारे गुरुद्वारा बोर्ड बरखास्त करून सहा महिन्यांसाठी प्रशासकाची नियुक्ती केली होती. मात्र, निर्धारित कालावधी संपल्यानंतरही प्रशासक कायम ठेवण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
यासंदर्भात बोर्डाच्या सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठात लेखी याचिका क्र. 10553/2022 दाखल केली होती. या प्रकरणात न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार ‘दि नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब बोर्ड, नांदेड’ पूर्ववत कार्यान्वित करण्याचे निर्देश शासनाला दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन कायदा करण्याऐवजी विद्यमान 1956 च्या कायद्याअंतर्गत तातडीने गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात कोणतेही बदल करावयाचे असल्यास स्थानिक शीख समाज, धार्मिक संस्था, तज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
सचखंड श्री हजूर साहिब हे जगभरातील शीख समाजाचे श्रद्धास्थान असून नांदेड व मराठवाड्यातील शीख समाजाचे या संस्थेशी ऐतिहासिक, धार्मिक आणि भावनिक नाते असल्याने 1956 चा कायदा रद्द करण्याचा निर्णय पुनर्विचारासाठी स्थगित करावा, अशी मागणी दशमेश पिता गुरुगोबिंदसिंहजी सेवाभावी संस्था, परभणी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर ग्रंथी सतनामसिंघ टाक, जहाँगीसिंघ बावरी, रघुवीरसिंघ टाक, हरमोनसिंघ टाक, झेलसिंघ बावरी, बलविरसिंघ जुनी, जगजीतसिंघ टाक, युवराजसिंघ टाक यांच्या सह आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis