बडनेरा रेल्वेस्थानकावर होणार सरकता जिना रेल्वे प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक
अमरावती, 30 जून (हिं.स.)। बडनेरा रेल्वेस्थानकावर सरकत्या पायऱ्यांचा जिना (एस्केलेटर) होणार असून चांगापूर येथे भुयारी मार्ग होणार आहे. सोमवारी रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात राज्यसभा खासदार डाॅ. अनिल बोंडे य
बडनेरा रेल्वेस्थानकावर होणार सरकता जिना रेल्वे प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक


अमरावती, 30 जून (हिं.स.)। बडनेरा रेल्वेस्थानकावर सरकत्या पायऱ्यांचा जिना (एस्केलेटर) होणार असून चांगापूर येथे भुयारी मार्ग होणार आहे. सोमवारी रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात राज्यसभा खासदार डाॅ. अनिल बोंडे यांनी याबाबतचा सविस्तर आढावा घेतला. येथील जिल्हा जनसंपर्क कार्यालयात राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत भुसावळ रेल्वे विभाग आणि रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या आणि प्रलंबित विकासकामांवर सविस्तर चर्चा करून ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.

या बैठकीत प्रामुख्याने चांगापूर रेल्वे भुयारी मार्गाच्या समस्येवर कायमस्वरूपी तांत्रिक तोडगा काढण्याबाबत आणि तेथील लाईट व्यवस्था सुधारण्याबाबत प्राधान्याने चर्चा करण्यात आली. पावसाळ्यात किंवा इतर वेळी निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना यावेळी डॉ. बोंडे यांनी दिल्या. भुसावळ ते चांदूर बाजार दरम्यान सुरू असलेल्या ‘अमृत भारत रेल्वेस्थानक’ योजनेच्या कामांच्या प्रगतीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यासोबतच बडनेरा रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी एस्केलेटर (सरकते जिने) बसवणे, स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमण तत्काळ हटवून रस्त्याचे काम गतीने पूर्ण करणे आणि अकोली स्टेशनवर रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देशित करण्यात आले.

या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ डीसीएम तपस्वी, विभागीय अभियंता पंचम, महारेलचे विभागीय अभियंता हुसेन, बडनेराचे सहायक अभियंता राणे, मुख्य सचिव सुनील सोमवंशी यांच्यासह रेल्वे व संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande