खरीप हंगामासाठी नागपूर विभागात खतांचा पुरेसा साठा
कृषी विभागाने ऑनलाइन उपलब्ध केली जिल्हानिहाय माहिती नागपूर, 30 जून (हिं.स.) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाने व्यापक तयारी केली असून, जिल्हा, तालुका आणि केंद्रनिहाय खतांच्या उपलब्धतेची
संग्रहित


कृषी विभागाने ऑनलाइन उपलब्ध केली जिल्हानिहाय माहिती

नागपूर, 30 जून (हिं.स.) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाने व्यापक तयारी केली असून, जिल्हा, तालुका आणि केंद्रनिहाय खतांच्या उपलब्धतेची अद्ययावत माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. नागपूर विभागात विविध प्रकारच्या खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

नागपूर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी समाधान धुळधुळे यांनी सांगितले की, डीएपी खताचा काही प्रमाणात तुटवडा असला तरी पर्यायी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कृषी विभागाच्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात डीएपी, एमओपी, एनपीकेएस, एसएसपी आणि युरियाच्या मिळून १२ लाख ६० हजार ३०५ बॅग उपलब्ध आहेत. याशिवाय जिल्ह्यातील ३,३२५ कृषी सेवा केंद्रांची माहितीही ऑनलाइन उपलब्ध करण्यात आली आहे.

विभागातील इतर जिल्ह्यांमध्येही खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून गोंदिया जिल्ह्यात २० हजार ४६८ मेट्रिक टन खतांचा साठा, भंडाऱ्यात १ लाख १ हजार २५७ बॅग, चंद्रपूरमध्ये ८ लाख ९ हजार ६१३ बॅग, गडचिरोलीत २ लाख ५२ हजार २७४ बॅग, तर वर्धा जिल्ह्यात ६ लाख ८२ हजार ७४० बॅग खतांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.शेतकऱ्यांना खतांची उपलब्धता, संबंधित कृषी सेवा केंद्रांचे संपर्क क्रमांक तसेच इतर माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर पाहता येणार असून, अडचण आल्यास स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande