
रायगड, 30 जून, (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात कर्करोगाचे लवकर निदान करून रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत जुलै महिनाभर विशेष फिरत्या मोबाईल व्हॅनद्वारे मोफत कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही व्हॅन जाऊन नागरिकांची तपासणी करणार असून, या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
महाराष्ट्रात मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग या तीन प्रकारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या आजारांचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शासनाच्या वतीने ही मोफत तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.
फिरत्या कर्करोग तपासणी व्हॅनमध्ये डेंटल चेअर, स्तन व गर्भाशय मुख तपासणीसाठी आवश्यक आधुनिक वैद्यकीय उपकरणे, तपासणी बेड तसेच इतर आवश्यक साधनसामग्री उपलब्ध आहे. शिबिरादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांकडून मुखाच्या कर्करोगाची तपासणी, आवश्यक असल्यास ओरल बायोप्सी, स्तनाच्या कर्करोगासाठी क्लिनिकल तपासणी व मेमोग्राफीसाठी विनामूल्य संदर्भ, तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी पॅप स्मीअर चाचणी केली जाणार आहे. संशयित रुग्णांची नोंद करून त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
जुलै महिन्यात पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, तळा, माणगाव, पोलादपूर, महाड, रोहा, अलिबाग, पेण आणि उरण या तालुक्यांतील विविध आरोग्य केंद्रांमध्ये ही तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी यांनी नागरिकांनी कोणतीही लक्षणे नसली तरी नियमित तपासणी करून या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. नियमित तपासणीमुळे कर्करोगाचे लवकर निदान होऊन जीवितहानी टाळण्यास मोठी मदत होऊ शकते, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)