
कोल्हापूर, 30 जून (हिं.स.)। कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतभेदाचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भाजप नेत्यांच्या वक्तव्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. हे पत्रक राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले असून, भाजप खासदार धनंजय महाडिक आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मनोगतांमुळे युतीमध्ये अनावश्यक गैरसमज निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापुढे सर्वांनी संयम आणि समंजसपणा दाखवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या पत्रकात भाजप हा राज्यातील मोठा घटक पक्ष असल्याचे मान्य करताना, युती धर्म पाळत राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही भाजपविरोधात थेट टीका केली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र गोकुळ निवडणुकीतील ठरावधारकांच्या आकडेवारीवरून निर्माण झालेल्या वादामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढल्याचे चित्र आहे. धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित करत काही नेत्यांच्या भूमिकांवर शंका व्यक्त केली होती, त्याला उत्तर देताना राष्ट्रवादीने आपली माहिती वस्तुनिष्ठ असल्याचा दावा केला आहे.
यामध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या भूमिकेवरही चर्चा झाली असून ते शिवसेना शिंदे गटात असूनही सहकार क्षेत्रात मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. तसेच कुपेकर आणि इतर काही गटांच्या मतांबाबतही गैरसमज पसरवू नयेत, असेही नमूद करण्यात आले आहे. निवडणुकीतील अवसायन ठरावांमुळे महायुतीलाच फटका बसू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, विभागीय सहकार उपनिबंधकांनी ४२७ संस्थांच्या सभासदत्व रद्द करण्याच्या निर्णयावरही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ही कारवाई निवडणुकीवर परिणाम करणारी असल्याचे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अन्यथा न्यायालयीन मार्ग स्वीकारण्याची तयारी असल्याचेही राष्ट्रवादीने सूचित केले आहे. एकूणच गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीतील समन्वय टिकवण्यासाठी सर्व पक्षांनी जबाबदारीने वागावे, अन्यथा राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar