
शहाणे - बडगुजर वादाचे महासभेत पडसाद, शिंदे सेनेने दिले कारवाईसाठी पत्र
नाशिक, 30 जून, (हिं.स.)। महानगरपालिकेच्या सदस्यांनी कोणत्याही सभेमध्ये गैरवर्तन केले तर त्यांना सहा महिन्यासाठी महासभेतून निलंबित करण्यात येईल अशी घोषणा महापौर हिमगौरी आहेर - आडके यांनी केली आहे.
सोमवारी नवीन नासिक प्रभाग समितीच्या सभेमध्ये माझी सभागृह नेते आणि विद्यमान नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि अपक्ष नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणारे मुकेश शहाणे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तीव्र वाद झाले होते. यामध्ये काही प्रमाणात शिवीगाळ आणि अश्लील भाषेचा देखील वापर झाल्याचा सांगण्यात येत आहे. हे सर्व घडत असताना सभागृहांमध्ये महिला प्रतिनिधी, अधिकारी देखील उपस्थित होत्या. या सर्व प्रश्नावरती आजच्या महासभेमध्ये उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना शिंदे पक्षाचे गटनेते अजय बोरस्ते यांच्यासह अन्य काही नगरसेवकांनी महापौर हिमगौरी अडके यांना पत्र देऊन या सर्व प्रश्नावरती चर्चा करावी अशी वर्तने करणाऱ्या नगरसेवकांवरती कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी केली होती. ज्यावेळी मंगळवारी सकाळी महापौर हिमगौरी आहेर - आडके यांच्या अध्यक्षतेखाली महासभा सुरू झाली. त्यावेळी हे पत्र चर्चेला घेण्याची मागणी करण्यात आली. सभागृहात एकमताने ही मागणी केल्यानंतर या पत्रावरती चर्चेला सुरुवात झाली.
महापौरांनी सभागृहात चर्चेला सुरुवात केल्यानंतर या संपूर्ण चर्चेमध्ये नगरसेवक दिनकर पाटील, अजिंक्य साने, राहुल दिवे, बंटी तिदमे, कोमल मेहरोलीया, महाले, यांच्या सह अन्य नगरसेवक सहभागी झालेले होते . या चर्चेच्या दरम्यान नगरसेवकांनी गैरवर्तन करणाऱ्या नगरसेवकांना निलंबित करण्याची मागणी केली तर काही नगरसेवकांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली. सभागृहात नगरसेवकांचा कौल लक्षात घेता भाजपाचे गटनेते अॅड. श्याम बडोदे यांनी सभागृहात चर्चेचा समारोप करताना महापौरांकडे आवश्यक ती कारवाई केली पाहिजे यापुढे अशा घटना होऊ नये आणि नगरसेवकांचा मानसन्मान कायम राहावा अशी मागणी केली.
या सर्व चर्चेच्या दरम्यान महापौर हिमगौरी आहेर यांनी आपल्या निर्णय देताना सांगितले की, शहराचा विकास महत्त्वाचा आहे. नाशिक शहराचं नावलौकिक आहे. असं सर्व असताना केवळ नगरसेवकांच्या कृत्यामुळे शहराचे बदनामी होता कामा नये याचे भान सर्वांनीच ठेवले पाहिजे. पक्ष कुठलाही शहराचा विकास हा महत्त्वाचाच आहे. शहराचं नावलौकिक वर्तनाने कमी होता कामा नये असे सांगताना महापौरांनी आपला निर्णय देताना सांगितले की जर यापुढे कोणत्याही महापालिकेच्या सभेमध्ये कोणत्याही नगरसेवकांनी गैरवर्तन केले तर कोणतीही पूर्वसूचना न देता सहा महिन्यासाठी संबंधित नगरसेवकांना निलंबित केले जाईल असा इशारा वजा निर्णय त्यांनी यावेळी घोषित केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV