
नाशिक, 30 जून (हिं.स.)। पंचवटी प्रभाग समितीच्या सभेत पंचवटी विभागातील प्रभाग एक ते सहा मधील सर्वच नगरसेवकांनी प्रभागातील महत्वाचा असलेला पाणी प्रश्न, घंटागाडी येत नसल्याचे आरोग्या प्रश्न,तसेच अधिकाऱ्यांना फोन करूनही उचलले जात नाही तर काही अधिकारी उडवा उडवीची उत्तर देत असल्याने सर्वच नगरसेवकांनी संबधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्नांचा भडीमार केला.
पंचवटी प्रभाग समितीची प्रभाग सभा पंचवटी प्रभाग सभापती रोहिणी पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. सभेस स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, हेमंत शेट्टी, नगरसेवक प्रमोद पालवे, नगरसेविका दिपाली गिते आदी उपस्थित होते.
प्रभाग सभेत प्रभाग क्रमांक चार मधील नगरसेविका सरिता सोनवणे यांनी प्रभागातील समर्थ नगर, अनुसया नगर पाण्याची समस्या गंभीर आहे.अधिकाऱ्यांना फोन केल्यावर त्यांच्याकडून तो उचलला जात नाही. पाण्याचे टँकर उपलब्ध केले जात नाहीत.प्रभागात मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्यावे लागते.अनेक ठिकाणी पथदीप नाही त्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरते याबाबत अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे असेही सोनवणे म्हणाल्या. नगरसेविका मोनिका हिरे यांनी अंगणवाडी शेजारी व आरोग्य केंद्राच्या बाजूला कचरा पडून असतो. पाणी बाणी असतांना प्रभागात टँकर मिळत नसल्याचे सांगितले.प्रभाग दोन मधील नगरसेवक अँड नामदेव शिंदे हेही संतप्त झाले होते.
प्रभागात अनेक ठिकाणी झाडे वाढली असून त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असल्याने असे झाड काढून टाकावे. आमच्या प्रभागात सफाई कामगार येत नाही त्यामुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.कुठल्या प्रभागामध्ये किती टँकर दिले जातात व कुठल्या ठिकाणे किती पाणी दिले जाते व पाणी कोण पुरवते याची माहिती देऊन त्याबाबतचे मस्टर दाखवा.नगरसेविका इंदुबाई खेताडे यांनी ठिकठिकाणी रस्त्यांची काम सुरू आहेत.याठिकाणी सुरक्षा रक्षक नाहीत तसेच धोकेदायक ठिकाणी बॅरिकेट लावले नाही त्यामुळे संबंधित ठेकरदारावर व अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV