
नंदुरबार, 30 जून (हिं.स.) केंद्र शासनाचा तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा २०१९ व नियम २०२०, तसेच शासनाच्या
सर्वकष धोरणानुसार जिल्ह्यातील तृतीयपंथीय घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व
त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी नंदुरबार येथे विशेष कल्याणकारी उपक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात
आले. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा कौशल्य विकास व मार्गदर्शन केंद्र आणि 'सेंटर फॉर युथ
डेव्हलपमेंट अँड ऍक्टिव्हिटीज' (CYDA) संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दोन महत्त्वपूर्ण विशेष शिबिरे व
मेळावे उत्साहात पार पडले, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी कळविले आहे.
दिनांक २५ जून २०२६ रोजी दुपारी १२:०० ते २:३० वाजेदरम्यान जिल्हास्तरीय तृतीयपंथी कल्याण व
तक्रार निवारण समिती, जिल्हा उद्योग केंद्र व सीवायडीए (CYDA) संस्थेच्या वतीने भव्य स्वयंरोजगार
मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या
प्रतिमेचे पूजन करून झाली. समाज कल्याण निरीक्षक सचिन जगताप यांनी प्रास्ताविकेतून उपस्थितांना या
मेळाव्याचा मुख्य उद्देश समजावून सांगितला. याप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक दिनेश पाटील यांनी
उपस्थित तृतीयपंथीयांना शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उद्योग व व्यवसाय विषयक
योजनांची सविस्तर माहिती दिली. यासोबतच, सीवायडीए (CYDA) संस्थेचे सागर सनेर यांनी
'उद्योगाची निवड कशी करावी, त्याचा उपयोग कुठे व कसा करावा' याविषयी मोलाचे मार्गदर्शन करत
योग्य व्यवसायाची निवड करण्याचा सल्ला दिला.
दिनांक २९ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ४:३० वाजेदरम्यान सहाय्यक आयुक्त समाज
कल्याण, जिल्हा कौशल्य विकास व मार्गदर्शन केंद्र आणि सीवायडीए (CYDA) संस्था यांच्या संयुक्त
विद्यमाने विशेष 'उद्योजकता प्रशिक्षण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये जिल्हा
कौशल्य विकास व मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त मंगेश पवार यांनी तृतीयपंथीयांसाठी उपलब्ध
असलेल्या विविध कौशल्य विकास व प्रशिक्षण योजनांवर प्रकाश टाकला. तसेच सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभागाच्या १३ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार नव्याने सुरू करण्यात आलेल्या 'बीज
भांडवल योजने'अंतर्गत कर्ज प्रक्रियेची व व्यवसाय उभारणीची संपूर्ण माहिती देण्यात आली.
या उद्योजकता प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेताना एकूण २२ सुशिक्षित बेरोजगार तृतीयपंथी व्यक्तींचे
कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी अर्ज भरून घेण्यात आले व त्यांची अधिकृत नोंदणी करण्यात आली.
यासोबतच, समाज कल्याण कार्यालयामार्फत तृतीयपंथीयांसाठीच्या नवीन 'बीज भांडवल योजने'अंतर्गत
एकूण २० तृतीयपंथी व्यक्तींचे व्यवसाय कर्ज अर्ज जागेवरच भरून घेण्यात आले.
दोन्ही महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे सूत्रसंचालन समाज कल्याण निरीक्षक सचिन जगताप यांनी केले. सदर सर्व
उपक्रमांचे यशस्वी नियोजन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांच्या कुशल
मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. हे दोन्ही कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सीवायडीए
(CYDA) संस्थेचे भावेश पवार व सुदाम वसावे यांच्यासह सचिन पाटील, राकेश पावरा, राजेश ठाकरे,
ज्ञानेश्वर नांद्रे, अनिल नाईक, कृष्णा कोकणी तसेच समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी व
कर्मचारीवृंद यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर