
पुणे, 30 जून, (हिं.स.) - कोथरूड येथील एका भूखंडाच्या एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) हक्कांमध्ये तब्बल ५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करत न्यायालयाच्या आदेशानंतर बंगळुरूस्थित सोभा डेव्हलपर्स लिमिटेड आणि कंपनीच्या चार पदाधिकाऱ्यांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात सोभा डेव्हलपर्स लिमिटेडसह कंपनीचे पदाधिकारी मनीष वर्मा (रा. विमाननगर), सुरजित चंदा (रा. कोथरूड) तसेच जगदीश नांगिनेनी आणि रवी मेमन (दोघेही रा. बंगळुरू) यांच्याविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत बांधकाम व्यावसायिक रोहन किशोर पाटे (वय ३८, रा. सहकारनगर) यांनी तक्रार दाखल केली असून, मार्च २०१४ ते जून २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन पाटे हे 'रोहन पाटे ग्रुप ऑफ कन्स्ट्रक्शन एलएलपी'चे भागीदार तसेच 'अमित एंटरप्रायझेस हाउसिंग लिमिटेड'चे संचालक आहेत.
पाटे कुटुंबीयांच्या 'अमित एंटरप्रायझेस हाउसिंग लिमिटेड' कंपनीसह जगदीश देशपांडे आणि इतरांच्या मालकीचा कोथरूड येथील सर्व्हे क्रमांक ७७/१ (पी) मधील सुमारे २७ हजार ४९९ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड २०१४ मध्ये बंगळुरूस्थित सोभा डेव्हलपर्स कंपनीला १०५ कोटी रुपयांना विकण्यात आला होता. तक्रारीनुसार, या भूखंडाच्या एफएसआय हक्कांबाबत सुमारे ५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु