
रायगड, 30 जून (हिं.स.)। इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कन्यादान योजने अंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह केलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग (ओबीसी) आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र दांपत्यांनी अर्थसहाय्य मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन रायगडचे सहाय्यक संचालक सुनील जाधव यांनी केले आहे.
सन २०१९-२० पासून ही योजना राबविण्यात येत असून, सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या पात्र दांपत्यांना २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. तसेच सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या पात्र स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक जोडप्यामागे ४ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी विवाहानंतर तीन महिन्यांच्या आत विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विवाह नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच अनुदान वितरित करण्यात येईल. सामूहिक विवाह सोहळ्यासाठी किमान १० जोडपी असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ केवळ प्रथम विवाहासाठी लागू असून, विधवा महिलांच्या पुनर्विवाहासाठीही ही योजना लागू आहे.
योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी सामूहिक विवाह आयोजित करणारी स्वयंसेवी संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित संस्थेविरुद्ध कोणताही गुन्हा किंवा न्यायालयीन प्रकरण प्रलंबित नसावे.
या योजनेसंदर्भातील अधिक माहिती व अर्ज प्रक्रियेसाठी इच्छुकांनी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, कच्छी भवन, नमिनाथ जैन मंदिराजवळ, श्रीबाग रोड, अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)