
लातूर, 30 जून, (हिं.स.)। हेल्मेट असते तर कदाचित एक जीव वाचला असता... हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित करणारी दुर्दैवी घटना निलंगा तालुक्यात घडली आहे. रस्ते अपघातांमध्ये हेल्मेटचा वापर किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव करून देणाऱ्या या प्रकरणात कासार शिरसी पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि नागरिकांमध्ये सुरक्षित वाहनचालना करण्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र, नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अजूनही अनेक कुटुंबांना आपल्या प्रिय व्यक्तींना गमवावे लागत आहे.
फिर्यादी माधव अशोक सूर्यवंशी (रा. मिरगाळी, ता. निलंगा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १२ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ८.०० वाजता त्यांचे भाऊ बसवराज अशोक सूर्यवंशी (वय ३५) हे मोटारसायकल (क्र. MH-12-CN-2464) वरून तांबाळा पाटी येथून मिरगाळीकडे जात असताना तांबाळा पाटी–ममदापूर रस्त्यावर भरधाव व निष्काळजीपणे येणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात बसवराज सूर्यवंशी गंभीर जखमी झाले. अपघात घडवून आणल्यानंतर संबंधित ट्रॅक्टर चालकाने जखमीला मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाताच्या तपासात आणखी एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आली असून, मृत दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान केले नव्हते. डोक्याला झालेला गंभीर आघात हा मृत्यूचे प्रमुख कारण ठरल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक बाब असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी कासार शिरसी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक १५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४ व १८४ अंतर्गत अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार टी. बी. माने करीत आहेत.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दुचाकी चालविताना चालकासह मागे बसणाऱ्या व्यक्तीनेही दर्जेदार हेल्मेट परिधान करावे. वेगमर्यादेचे पालन करावे, वाहतूक नियमांचे उल्लंघन टाळावे आणि अपघात झाल्यास जखमी व्यक्तीला तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी. एका क्षणाची निष्काळजीपणा आणि हेल्मेट न वापरण्याची चूक संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते, हा संदेश या घटनेतून प्रत्येक वाहनचालकाने घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis