
पुणे, 30 जून (हिं.स.) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) मार्गावरील बोगदा क्रमांक २ मध्ये सोमवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास एका कारवर दोन ते तीन दगड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत कारच्या पुढील काचेचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याकडे जाणारी कार बोगदा क्रमांक २ मधून जात असताना अचानक दोन ते तीन दगड कारच्या पुढील काचेवर पडले. त्यामुळे काच फुटून तिचे तुकडे चालक उचप्पा खतनाप्पा वरचल्ली (वय ५३, रा. खोपोली, जि. रायगड) यांच्या अंगावर उडाले. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत वाहनावरील नियंत्रण कायम ठेवले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
या घटनेप्रकरणी कारचालकाने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. माहिती मिळताच खंडाळा महामार्ग पोलिसांचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलिस उपनिरीक्षक समीर कटपाळे तसेच महाराष्ट्र सुरक्षा रक्षक कर्मचारी सुरेश ढेरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.दरम्यान, १ मे २०२६ रोजी मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक (मिसिंग लिंक) वाहतुकीसाठी अधिकृतपणे खुली करण्यात आली होती. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण झाले होते.
या नव्या मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवासात साधारण २५ ते ३० मिनिटांची बचत होत असून, वाहतूक कोंडीच्या वेळी हा वेळ तब्बल एका तासापर्यंत कमी होतो. खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यातील दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी हा मार्ग उभारण्यात आला असला, तरी बोगद्यात दगड कोसळल्याच्या ताज्या घटनेमुळे या मार्गावरील सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु