
रायगड, 30 जून (हिं.स.) इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापरामुळे भविष्यात ईव्ही चार्जिंग स्टेशनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांनी राज्यभर 'अमृत ईव्ही चार्जिंग स्टेशन' व्यवसाय प्रोत्साहन उपक्रम सुरू केला आहे. हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना देतानाच युवक, महिला आणि ग्रामीण उद्योजकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत युवक-युवती, महिला उद्योजक, स्वयं सहाय्यता गट (SHG), सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील उद्योजक, शेतकरी उत्पादक गट तसेच ग्रामीण भागातील इच्छुक नागरिकांना ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी आवश्यक प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, व्यवसाय नियोजन, प्रकल्प अहवाल तयार करणे, बाजारपेठेचा अभ्यास आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच भारतीय स्वदेशी कंपन्या व तज्ज्ञांच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाची माहितीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार असून त्यामुळे नवीन उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल उभारणे अधिक सुलभ होणार आहे. ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणीबरोबरच चार्जिंग उपकरणांची देखभाल, सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग सुविधा, चार्जिंग नेटवर्क ऑपरेशन, ग्रीन एनर्जी सेवा आणि ईव्ही उपकरण विक्री व देखभाल अशा विविध क्षेत्रांतही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
इच्छुक लाभार्थ्यांनी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावरील 'विशेष योजना – EV Charging Station Partner' या विभागातून ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील इच्छुकांनी जिल्हा व्यवस्थापक, अमृत रायगड यांच्याशी ९११२२२८७५९ या क्रमांकावर संपर्क साधावा. हरित महाराष्ट्र आणि आत्मनिर्भर उद्योजक घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे अमृततर्फे सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)