विकास करार रद्द झाल्यास मुद्रांक शुल्क परतावा बंद
-महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर -महसुलाचे नुकसान टाळणे अन् तरतुदींचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात स्पष्टीकरण जोडणार मुंबई, 30 जून (हिं.स.)। विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाल्यास कोणत्याही परिस्थितीत मुद्रांक शु
No Stamp Duty Refund if Development Agreement Cancelled


-महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर

-महसुलाचे नुकसान टाळणे अन् तरतुदींचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात स्पष्टीकरण जोडणार

मुंबई, 30 जून (हिं.स.)। विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाल्यास कोणत्याही परिस्थितीत मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही, अशी स्पष्ट तरतूद असलेली महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम ४८ मध्ये अत्यंत महत्त्वाची सुधारणा करणारे विधेयक आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले. राज्याच्या महसुलाचे संरक्षण करणे आणि कायद्यातील पळवाटांचा होणारा गैरवापर रोखणे हा या सुधारणेचा मुख्य उद्देश आहे.

वाढते दावे आणि प्रशासकीय अडचणी

प्रत्यक्ष व्यवहारात असे निदर्शनास आले आहे की, विकास करारांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क भरले जाते. तथापि, व्यावसायिक कारणांमुळे किंवा परस्पर मतभेदांमुळे हे करार पुढील टप्प्यावर रद्द, निरस्त किंवा समाप्त केले जातात आणि त्यानंतर भरलेल्या मुद्रांक शुल्काच्या परताव्यासाठी शासनाकडे अर्ज सादर केले जातात. अशा प्रकरणांमध्ये तथ्य पडताळणी करताना प्रशासकीय अडचणी निर्माण होतात आणि परताव्याचे अनेक दावे वाढतात.

मुद्रांक शुल्क आकारणीचा नियम

मुद्रांक शुल्क हा दस्ताच्या अंमलबजावणीवर आकारला जातो; कराराची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली किंवा नाही, यावर तो अवलंबून नसतो. त्यामुळे करार रद्द झाला तरी अशा प्रकरणांमध्ये परतावा देणे महसुली दृष्ट्या राज्यासाठी प्रतिकूल व नुकसानकारक ठरत होते. तसेच कायद्यातील सवलतींच्या तरतुदींचा गैरवापर होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

कायद्यात होणार नवीन 'स्पष्टीकरण' दाखल

राज्याच्या महसुलाचे संरक्षण करणे तसेच कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात एकसमान व स्पष्टपणे व्हावी, यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम ४८ मधील परंतुका नंतर सदर परंतुकाची शिथिलता किंवा परताव्याची तरतूद ही 'करारनाम्याप्रमाणेच' समान मुद्रांक शुल्क लागू होणाऱ्या विकास करारासह इतर कोणत्याही दस्तांना लागू होणार नाही. अशी नोंद करण्यात येणार आहे.

सद्याच्या तरतुदींमधील पळवाटा बंद

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम ४७ अन्वये विशिष्ट प्रकरणांमध्ये मुद्रांक शुल्क परतावा/सवलत देण्याची तरतूद असून कलम ४८ (१) मध्ये त्यासाठीची कालमर्यादा नमूद आहे. सध्याच्या तरतुदींमध्ये काही विशिष्ट प्रकरणांकरिता परंतुकाद्वारे जी शिथिलता देण्यात आली होती, तिचा विकास करारांच्या बाबतीत गैरवापर रोखण्यासाठी हे कडक पाऊल उचलण्यात आले आहे. या सुधारणेमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात आणि मुद्रांक शुल्क विभागात अधिक पारदर्शकता येईल असे स्पष्ट करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande