रत्नागिरी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात आता २५ सदस्य
रत्नागिरी, 30 जून, (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील सदस्यसंख्या २१ वरून २५ करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने आज यासंदर्भातील आदेश जारी केला असून, त्यामुळे बँकेचे प्रशासन
रत्नागिरी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात आता २५ सदस्य


रत्नागिरी, 30 जून, (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील सदस्यसंख्या २१ वरून २५ करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने आज यासंदर्भातील आदेश जारी केला असून, त्यामुळे बँकेचे प्रशासन आणि भविष्यातील निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचे बदल होणार आहेत.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील तरतुदींनुसार शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्य सहकार आयुक्त व निबंधकांनी पाठविलेल्या पत्रात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील सदस्यसंख्या २१ वरून २५ पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

संचालक मंडळात चार नवीन जागा निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांना आणि घटकांना प्रतिनिधित्वाची अधिक संधी उपलब्ध होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जात असल्याने कर्जवाटप, शेती वित्तपुरवठा, पतसंस्था आणि प्राथमिक कृषी पतसंस्थांच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये अधिक व्यापक सहभाग अपेक्षित आहे.

संचालकांची संख्या वाढल्याने बँकेच्या निर्णयप्रक्रियेत अधिक मतप्रवाह येण्याची शक्यता असून, प्रशासनिक खर्चातही काही प्रमाणात वाढ होऊ शकते. आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीत चार अतिरिक्त जागांमुळे राजकीय आणि सहकारी क्षेत्रातील समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande