नाशिक सिडको प्रभाग २९ मध्ये तीव्र पाणीटंचाई; सभेपूर्वी महापालिकेविरोधात मोर्चा
नाशिक , 30 जून (हिं.स.)। सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मध्ये तीव्र झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रभागाच्या पहिल्याच सभेपूर्वी नागरिकांचा संताप उफाळून आला. नगरसेवक भूषण राणे यांनी प्रभागातील महिला व नागरिकांसह थेट सभागृहाबाहेर मोर्चा आणत महापा
Outburst of anger outside


नाशिक , 30 जून (हिं.स.)। सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मध्ये तीव्र झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रभागाच्या पहिल्याच सभेपूर्वी नागरिकांचा संताप उफाळून आला. नगरसेवक भूषण राणे यांनी प्रभागातील महिला व नागरिकांसह थेट सभागृहाबाहेर मोर्चा आणत महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार निषेध नोंदविला. पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत असून, टँकरने पाणीपुरवठ्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात टँकर उपलब्ध होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

मोर्चादरम्यान भूषण राणे यांनी उपस्थित पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांना जाब विचारत, जोपर्यंत नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणी मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा इशारा दिला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना सुरू असल्याचे सांगितल्यानंतर आंदोलन शांत झाले.

दरम्यान, प्रभाग सभापती बाळकृष्ण शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सिडको प्रभागाच्या पहिल्याच सभेत पाणीपुरवठा, दूषित पाणी, ड्रेनेज लाईन आणि नालेसफाई हेच प्रमुख विषय ठरले. सभागृहात उपस्थित जवळपास सर्वच नगरसेवकांनी सिडकोतील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याची खंत व्यक्त केली. अनेक भागांत पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नसून, मिळणारे पाणीही गढूळ व दूषित असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर, नगरसेवक प्रवीण तिदमे, मुकेश शहाणे, डॉ. पुनम महाले, पल्लवी गणोरे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी सिडकोतील ३० ते ३५ वर्षे जुन्या ड्रेनेज लाईन बदलण्याची जोरदार मागणी केली.

वाढती लोकसंख्या लक्षात घेता जुन्या व जीर्ण झालेल्या ड्रेनेज लाईनमुळे वारंवार चेंबर तुंबणे, ड्रेनेज लिकेज होणे आणि सांडपाणी रस्त्यावर येणे या समस्या गंभीर बनल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण सिडकोसाठी नवीन डीपीआर तयार करून मोठ्या व्यासाच्या नवीन ड्रेनेज पाइपलाइन टाकण्याची मागणी करण्यात आली.पावसाळा सुरू होऊनही अनेक नैसर्गिक नाल्यांची साफसफाई अपूर्ण असल्याचा आरोप करत सुधाकर बडगुजर, मुकेश शहाणे, प्रवीण तिदमे, सुवर्णा मटाले आणि प्रतिभा पवार यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कागदोपत्री नालेसफाई दाखविण्यापेक्षा प्रत्यक्ष कामे पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.

पाणीटंचाई, दूषित पाणी, ड्रेनेज आणि नालेसफाई या प्रश्नांवर कविता नाईक, किरण गामणे, सुवर्णा मटाले, प्रियंका दोंदे, वैशाली दळवी, माधुरी डेमसे यांच्यासह उपस्थित सर्वच नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande