
मुंबई, 30 जून (हिं.स.)। : पुणे शहरातील पाषाण येथील सांडपाणी शुद्धीकरण (एसटीपी) प्रकल्पातील कामाची चौकशी करण्यात येईल. तसेच सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा कार्यान्वित न ठेवणाऱ्या सोसायट्यांना अंतिम १५ दिवसांची नोटीस देऊनही नियमांचे पालन न झाल्यास त्यांचे नळजोड तोडण्याचे निर्देश दिले जातील, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
पाषाण येथील एसटीपी प्रकल्पातून पाण्याचे पुरेसे शुद्धीकरण होत नसल्याबाबत सदस्य उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला.
मंत्री उदय सामंत म्हणाले, पाषाण येथील प्रकल्पासाठी २३ सप्टेंबर २०२२ रोजी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती. फेरनिविदा प्रक्रियेनंतर सुमारे ४.३१ कोटी रुपयांचे काम मे.परशुराम कन्स्ट्रक्शनला देण्यात आले. काही कालावधीसाठी देखभाल-दुरुस्तीमुळे एसटीपी प्रकल्प बंद होता; मात्र सध्या तो कार्यान्वित आहे. तरीही कामाच्या मुदती, देखभाल-दुरुस्ती आणि दोषदायित्व कालावधीबाबत काही त्रुटी झाल्या आहेत का, याची चौकशी करण्यात येईल.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १२६ पैकी ६२ सोसायट्यांना त्यांच्या सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा कार्यान्वित नसल्याने नोटिसा बजावण्यात आल्या असून २४ सोसायट्यांचे नळजोड तोडण्यात आले आहेत. उर्वरित सोसायट्यांना अंतिम १५ दिवसांची मुदत देण्यात येईल. त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास त्यांच्या नळजोडांवरही कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर