पिंपरी-चिंचवड महापालिकेचा इशारा : थकबाकीदारांवर जप्तीची मोहीम सुरू होणार
पिंपरी, 30 जून (हिं.स.)पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता करावर देण्यात आलेल्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत असून, आर्थिक वर्ष २०२६-२७ चा मालमत्ता कर या तारखेपर्यंत ऑनलाइन भरणाऱ्या
PCMC


पिंपरी, 30 जून (हिं.स.)पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता करावर देण्यात आलेल्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत असून, आर्थिक वर्ष २०२६-२७ चा मालमत्ता कर या तारखेपर्यंत ऑनलाइन भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर १० टक्के सवलत दिली जाणार आहे. या मुदतीनंतर ही सवलत उपलब्ध राहणार नसल्याने नागरिकांनी तातडीने कर भरावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

महापालिका हद्दीत सध्या ७ लाख ४४ हजारांहून अधिक मालमत्ताधारक आहेत. त्यापैकी आतापर्यंत ४ लाख १५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी ४८३ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कराचा भरणा केला आहे. यामध्ये जवळपास ३ लाख ४६ हजार नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने कर भरून १० टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. या योजनेला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे.

कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी उर्वरित मालमत्ताधारकांनीही अंतिम मुदतीपूर्वी कर भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

दरम्यान, १ जुलै २०२६ पासून मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्ध विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात येणार आहे. वारंवार सूचना व जप्तीच्या नोटिसा देऊनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी सर्व विभागीय कार्यालयांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करून वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande