यशवाडी दुर्घटनाग्रस्त मदत व शासकीय नोकरी द्या; भोई समाज क्रांती दलाची मागणी
परभणी, 30 जून, (हिं.स.)। यशवाडी येथील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी तसेच कुटुंबातील एका सदस्यास शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी भोई समाज क्रांती दलाच्या वतीने जिल्हा
यशवाडी दुर्घटनाग्रस्त मदत व शासकीय नोकरी द्या; भोई समाज क्रांती दलाची मागणी


परभणी, 30 जून, (हिं.स.)। यशवाडी येथील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी तसेच कुटुंबातील एका सदस्यास शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी भोई समाज क्रांती दलाच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जिल्हाधिका-याना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुर्घटनेत मृत्यू झालेल्या बहुतांश व्यक्ती तरुण व कुटुंबाचा आधार असलेल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे विधवा पत्नी, लहान मुले-मुली तसेच वृद्ध आई-वडील यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. कुटुंबातील कमावती व्यक्ती गमावल्याने अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. सध्या प्रशासनाच्या वतीने प्रत्येकी 5 लाख रुपये आणि मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने 5 लाख रुपये अशी एकूण 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ही मदत अत्यंत अपुरी असल्याने शासनाने विशेष बाब म्हणून प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यासोबतच प्रत्येक बाधित कुटुंबातील एका पात्र सदस्याला शासकीय सेवेत सामावून घेऊन त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. ही मागणी 31 जुलै 2026 पर्यंत मान्य न झाल्यास सर्व मृतांच्या कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भोई समाज क्रांती दलाने निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनावर भोई समाज क्रांती दलाचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष बापुराव तावडे, गोविंदराव जमदाडे, केशवराव आडणे, गुणाजी तमखाने, दुर्गादास मेसरे, कृष्णा हिरवे यांच्यासह अन्य समाजबांधवांच्या स्वाक्षर्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande