पुणे - कमी दराच्या निविदांमुळे विकासकामांच्या दर्जावर प्रश्न; आयुक्तांचे धोरण जाहीर करण्याचे आश्वासन
पुणे, 30 जून (हिं.स.)पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी ३० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी दराने निविदा भरल्या जात असल्याने कामांच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर आयुक्त न
Naval Kisahor ram


पुणे, 30 जून (हिं.स.)पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी ३० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी दराने निविदा भरल्या जात असल्याने कामांच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर आयुक्त नवल किशोर राम यांनी कमी दराच्या निविदांबाबत पुढील दहा दिवसांत स्वतंत्र धोरण जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

नगरसेवक गणेश बिडकर यांनी शहरातील पाणीपुरवठा व इतर विकासकामांच्या काही निविदा तब्बल ४३ टक्के कमी दराने मंजूर होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. अशा परिस्थितीत कामांचा दर्जा कसा टिकवून ठेवला जाणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच कमी दरामुळे निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचा आरोप करत अशा निविदांवर निर्बंध आणण्याची मागणी केली. यावर अतिरिक्त आयुक्त नंदकिशोर जगताप यांनी संबंधित निविदा प्रामुख्याने रस्त्यांच्या पुनर्स्थापनेच्या कामांशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले.

शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले की, कमी दराने निविदा मिळाल्या असल्या तरी ठेकेदारांकडून दर्जेदार कामे करून घेतली जात आहेत. अशा निविदांमध्ये ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या आतापर्यंत तीन बैठका झाल्या आहेत. समितीचा अहवाल लवकरच आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, ३० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी दराच्या निविदा येत असल्याने विकासकामांचा दर्जा अबाधित राहावा, यासाठी नगरसेवकांशी चर्चा करून पुढील दहा दिवसांत योग्य धोरण जाहीर करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande