
रायगड, 30 जून (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात काही दिवसांच्या पावसाच्या खंडानंतर पुन्हा झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधानाचे हास्य फुलले आहे. अंकुरलेल्या भाताच्या रोपांसह विविध खरीप पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस लाभदायक ठरल्याने बळीराजाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरणीची कामे पूर्ण केली होती. पेरलेले बियाणे उगवून शेतात हिरवीगार रोपे डोलू लागली होती. मात्र, त्यानंतर काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने अंकुरलेल्या पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली होती. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने अनेक शेतकरी चिंतेत होते. मात्र, पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे पिकांना आवश्यक ओलावा मिळाला असून भात शेतीसह इतर खरीप पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात शेती ही आजही अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. औद्योगिकीकरण वाढत असले तरी हजारो शेतकरी निसर्गाच्या भरोशावर शेती करत आहेत.
कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते, पिकांच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात सातत्याने पाऊस होणे अत्यंत आवश्यक असते. वेळेवर पडणारा पाऊस उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे आगामी काळातही पावसाने सातत्य राखावे, खरीप हंगाम भरघोस व्हावा आणि बळीराजाच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. पावसाच्या पुनरागमनामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नव्या आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)