
परभणी, 30 जून (हिं.स.) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तसेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजना 2026-27 मध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी 50 हजार रुपये तर मुलाखत पूर्वतयारीसाठी 25 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
अमृतच्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहाणा, कानबी आदी समाजघटकांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सन 2026-27 मध्ये यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा-2026 उत्तीर्ण झालेल्या आणि या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ https://mahaamrut.org.in/ वापरण्याचे निर्देश देण्यात आले असून, योजनेसंदर्भातील सर्व माहिती, सूचना व अद्यतने याच संकेतस्थळावर उपलब्ध असतील.
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत अडचण आल्यास परभणी जिल्हा अमृत कार्यालयाशी 7391065473 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला, बीएसएनएल कार्यालयाजवळ, परभणी येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केले आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis